Ad will apear here
Next
रानफुलांचा प्रदेश : कास पठार
फोटो : https://kas.ind.in/

साताऱ्याजवळचं कास पठार हा भूलोकीचा स्वर्ग आहे. निसर्गानं काही ठिकाणंच अशी घडवून ठेवली आहेत, की तिथल्या भौगोलिक परिस्थितीमुळे, तिथल्या वातावरणामुळे त्या ठिकाणांना अप्रतिम सौंदर्याचं वरदान लाभतं. कास पठारावरही त्याचीच अनुभूती मिळते. ‘चला भटकू या’मध्ये आज कास पठारावर सहल...
..........
सातारा जिल्ह्यात पाहण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत. त्यापैकी ठोसेघर, सज्जनगड अशा काही ठिकाणांची माहितीही आपण घेतली आहे. कासचं पठार हा त्यातला एक वेगळाच घटक आहे. सातारा शहराकडून सज्जनगडाच्या दिशेनं निघालं, की कास-बामणोलीकडे जाण्याचा फाटा लागतो. शहरापासून सुमारे २३ किलोमीटरवर हे पठार आहे. उंचावरच्या या भागाची रचना अशी झाली आहे, की हा सलग टापू विस्तीर्ण प्रदेशावर आपलं राज्य करतो. पावसाळ्याचा हंगाम संपत आला, की इथे छोटी छोटी रानफुलं उगवायला लागतात. शेकडो जातींच्या या झाडांवरची फुलं हा सगळा परिसर सौंदर्यानं न्हाऊन टाकतात. निसर्गाचा हाच चमत्कार बघण्यासाठी हजारो पर्यटक इथं दर वर्षी गर्दी करतात.

कास पठाराची समुद्रसपाटीपासूनच उंची १२१३ मीटर आहे. सातारा जिल्हा हा एकीकडे भरपूर पाऊस आणि दुसरीकडे दुष्काळी परिस्थिती यासाठी ओळखला जातो. सुदैवानं कास पठाराचा हा परिसर भरपूर पावसाचा आहे. इथं दर वर्षी सरासरी अडीच ते तीन हजार मिलिमीटर एवढा पाऊस कोसळतो. कास पठाराचा परीघही विस्तीर्ण आहे. सुमारे १७९२ हेक्टर एवढ्या प्रचंड जागेत हे पठार पसरलेलं आहे. त्यापैकी सरकारच्या ११४२ हेक्टर जमीन वन खात्याच्या ताब्यात आहे, तर ६५० हेक्टर जमीन खासगी आहे. तीसुद्धा याच कास पठाराचा एक भाग आहे.

कास पठार विविध प्रकारच्या दुर्मीळ वनस्पती, कीटक आणि प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे. या पठारावर पश्चिम घाटातील अत्यंत दुर्मीळ असलेल्या सुमारे ८५०पेक्षा अधिक जातीच्या वनस्पतींचे प्रकार आढळून येतात. त्यात अनेक औषधी वनस्पतींचा समावेश आहे. या वनस्पती एवढ्या विविध रंगांची फुलं तयार करतात, की त्यांच्या आकर्षणानं कितीतरी प्रकारचे कीटक, पशुपक्षी इथे येतात. या भागात कीटक आणि विविध प्रकारच्या फुलपाखरांच्या सुमारे ३२ जाती आढळून आल्या आहेत. त्याशिवाय सरपटणाऱ्या प्राण्यांच्या १९ प्रजाती, सस्तन प्राण्यांच्या १० आणि पक्ष्यांच्या ३० प्रकारच्या प्रजाती इथं आढळून आलेल्या आहेत.

काही वनस्पतींबरोबरच प्राणी, कीटक प्रदेशनिष्ठ असतात. म्हणजे त्याच प्रकारच्या वातावरणात, त्याच पद्धतीच्या भौगोलिक परिस्थितीत त्यांचा विकास होतो. कास पठार आणि परिसरात अशा अनेक दुर्मीळ आणि अतिदुर्मीळ वनस्पती आहेत. ‘रेड डाटा बुक’मधील फुले असणाऱ्या जवळपास ४० प्रजाती कास पठारावर आढळतात. प्राणी, कीटक यांच्या वाढीलाही हे हवामान पोषक असून, त्यामुळेच इथं एवढ्या प्रमाणातलं जैववैविध्य आढळून येतं.

अनेक विविधरंगी फुलं, पानं, वेगवेगळ्या रचना असलेली झाडं, यामुळे हा परिसर सप्टेंबर महिन्यात अक्षरशः नटून जातो. पावसाळा संपत असल्याची जाणीव होऊ लागलेली असते, वातावरणात एक धुंद गारवा असतो. झोडपणारा पाऊस ओसरून रिमझिम पावसाच्या सरी अध्येमध्ये सुखावत असतात. याच मोसमात या फुलांना बहर येतो आणि अख्खं पठार फुलांच्या ताटव्यांनी भरून जातं. संपूर्ण जमिनीवर फुलांच्या नक्षीचा गालिचा पसरावा, तसं दृश्य इथं पाहायला मिळतं. डोंगर, नदीचं निळंशार पाणी आणि फुलांनी फुलून गेलेला परिसर, हा नजाराच फार विलोभनीय असतो. अध्येमध्ये दर्शन देणाऱ्या सूर्याचे किरण हवेतल्या जलबिंदूंबरोबर संधान बांधून इंद्रधनुष्याचे खेळही दाखवत असतात. पांढऱ्या, निळ्या, लाल, गुलाबी, जांभळ्या, अशा कितीतरी रंगांची फुलं नजर वेधून घेत असतात. आपण नंदनवनात असल्याचा भास होतो, तो याच ठिकाणी.


एकेकाळी हे पठार फार दुर्लक्षित होतं. पर्यटकांचं लक्ष तिकडे गेलं नव्हतं आणि ते फारसं प्रसिद्धही नव्हतं. साधारण ९०च्या दशकानंतर कासचं पठार चर्चेत येऊ लागलं. इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढली आणि काही प्रमाणात त्यांचा उपद्रवसुद्धा वाढला. त्यामुळे सरकारला हस्तक्षेप करून काही कडक नियम करावे लागले. आता तर या परिसरानं जागतिक स्तरावर सातारा जिल्ह्याचा लौकिक वाढवला आहे. कास पुष्पपठाराला पश्चिम घाटासह वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणजेच जागतिक वारसास्थळाचा दर्जा ‘युनेस्को’कडून देण्यात आला आहे.

पठारावर फुलणाऱ्या फुलांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही रंग बदलणारी फुलं आहेत. दर पंधरा दिवसांनी त्यांचे रंग बदलत राहतात. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीला एका वेगळ्या रंगाचा पट्टा काही दिवसांतच बदलून एकदमच वेगळ्या रंगांत न्हाऊन निघतो. काही फुलं दर वर्षी फुलणारी आहेत, तर काही ठराविक वर्षांनंतर फुलतात. काही सात वर्षांनी फुलणारी फुलं आहेत. नऊ वर्षांनी फुलणारी टोपली कार्वी हे कास पठाराचं वैशिष्ट्य आहे. ती फुलं पाहायला मिळणं, हे मोठंच नशीब असतं.

पावसाळ्याच्या आगमनापासूनच पठारावर काही फुलं फुलायला सुरुवात होते; मात्र त्यांचं प्रमाण कमी असतं. जून महिन्याच्या अखेरीला इथे पांढरे हबे आमरीचे कोंब उगवतात. तसेच दोन तुऱ्यांची वायतुरा ही वनस्पती दिसते. ही वनस्पती हे कासचं वैशिष्ट्य आहे. लगेचच पिवळी सोनकी आणि कवळ्याची मिकी माउससारखी स्मिथियाची फुले उगवतात. मिकीमाउस फुलं पिवळ्या रंगाची असतात. त्यांचा आकार चटकन कुणाचंही लक्ष वेधून घेतो. श्रावणात निळी सीतेची आसवे आणि लाल रंगाची तेरड्याची फुले, मध्येमध्ये पांढऱ्या गेंदांच्या फुलांचे ताटवेच्या ताटवे फुललेले दिसतात. या पठारावर कंदी पुष्पांचे विविध प्रकार, तसेच निचुर्डी, अबोलिमा, ब्युगोनिया, दीपकांडी, चवर, गौरीहार, रानहळद, आभाळी, नभाळी, हत्तीची सोंड, सापकांदा, नागफणी, शेषगिरी, ड्रॉसेरा इत्यादी नाना प्रकारची फुलं उगवतात. भाद्रपद संपत असताना या फुलांचा हंगाम अगदीच बहरात असतो.

फुलं, कीटक यांचे अभ्यासक या भागात आवर्जून जातातच; पण फक्त निसर्गाचा आस्वाद घ्यायला आलेल्या पर्यटकांचीही या काळात भरपूर गर्दी असते. त्यामुळेच आता इथे जाणाऱ्या पर्यटकांसाठी रीतसर पार्किंग आणि प्रवेश शुल्क अशी सुविधा सरकारने सुरू केली आहे. www.kas.ind.in या वेबसाइटवरून प्रवेश शुल्क आगाऊ भरता येतं. फुलं आणि निसर्गप्रेमी असाल, तर कासला या मोसमात अवश्य भेट द्या. सुटीचा दिवस टाळून गेलात, तर कमी त्रासात उत्तम दर्शन होईल, हेही तेवढंच खरं.

कासला जाण्यासाठी :
साताऱ्याहून २३ किलोमीटर अंतर. सज्जनगडाच्या रस्त्यावर फाटा. स्वतःची गाडी घेऊन जाणंच सोयीस्कर.

- अभिजित पेंढारकर
ई-मेल : abhi.pendharkar@gmail.com

(लेखक चित्रपट, दूरचित्रवाणी, कला आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत.)

(‘चला, भटकू या’ हे सदर दर बुधवारी प्रसिद्ध होते.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZRWBG
Similar Posts
कास पठारावरील रानफुलांच्या बहराला सुरुवात; यंदाचा हंगाम सुरू पुणे : दुर्मीळ जातीच्या रानफुलांनी बहरणारे कासचे पठार बघण्यासाठीची पर्यटक, अभ्यासकांची प्रतीक्षा आता संपली आहे. एक सप्टेंबरपासून वन विभागाने येथे भेट देण्याकरिता नावनोंदणी सुरू केली आहे.
वैभवशाली साताऱ्याची सफर – भाग दोन ‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात आपण सातारा शहराची माहिती घेतली. आजच्या भागात जाऊ या साताऱ्याच्या पश्चिमेला, कास पठार आणि वासोटा, नागेश्वरकडे.
ठोसेघरचं रौद्र सौंदर्य पावसाळ्यात सगळी मरगळ झटकून ताज्या टवटवीत झालेल्या डोंगरदऱ्या आणि त्यातून वाहणारे असंख्य धबधबे, हे पर्यटकांचं विशेष आकर्षण असतं. साताऱ्याजवळचा ठोसेघर धबधबाही त्यापैकीच एक. ‘चला, भटकू या’ सदरात या वेळी ठोसेघर आणि सज्जनगडाची सफर...
ऐतिहासिक वारसा सांगणारी बारामोटेची विहीर आडगावातली, ऐतिहासिक संदर्भ असलेली, वैशिष्ट्यपूर्ण अशी ठिकाणं निखळ आनंद देणारी असतात. अनेक वर्षं ती दुर्लक्षित राहतात; पण कधीतरी एकदम प्रकाशात येतात आणि तिथे पर्यटकांचा ओघ सुरू होतो. सातारा जिल्ह्यातलं शेरेलिंब गावातलं बारामोटेची विहीर हे ठिकाण असंच अलीकडे जास्त प्रकाशात आलेलं. ‘चला भटकू या’मध्ये आज जाऊ या त्या विहिरीवर

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language